'वाचाल तर वाचाल' ही म्हण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहेच. पण तरीही प्रत्येकजण 'वाचतोच' असे नाही.
कुणाला वाचनाची गोडी नसते, कुणाला वाचनासाठी वेळ नसतो किंवा कुणाला गोडी किंवा वेळ उपलब्ध असूनही आजारपण म्हातारपण यामुळे वाचणे संभव होत नाही. त्यामुळे नेहमी वाचणारांचेच वाचणे घडते आणि न वाचणारांचे किंवा वाचू न शकणारांचे वाचणे काही घडत नाही. वाचन करणारांसाठी छापील पुस्तके किंवा ई-बुक्स असे पर्याय आता उपलब्ध आहेतच. पण ज्यांचे वाचन होत नाही त्यांच्यासाठी पूर्वीच्या काळी कीर्तनकार, प्रवचनकार, वक्ता, कथेकरी हाच आधार असायचा. पण ऑडिओ बुक्स हा पर्याय आता वाचणाऱ्या किंवा न वाचणाऱ्या सर्वांसाठी सहजसुलभपणे उपलब्ध झाला आहे. आता प्रत्येकजण आपापल्या वेळ आणि सोयीनुसार कुठेही आणि कधीही, एकट्याने किंवा सोबतीने कोणतेही पुस्तक किंवा ग्रंथ सहजपणे ऐकू शकतो.
ऑडिओ बुक्स अर्थात श्राव्यपुस्तके ही संकल्पना आता आपल्याकडे बहुतेकांच्या परिचयाची किंवा वापराची झाली आहे. श्रेष्ठ भारतीय व जागतिक साहित्य सर्वदूर समाजाच्या सर्व थरांत पोहोचवण्यासाठी ऑडिओबुक अर्थात श्राव्य माध्यम हे सर्वात प्रभावी व इथून पुढे कायमस्वरूपी उपयुक्त असे माध्यम आहे.
वाचणे ऐकणे सहजतुलना
आपण थोडक्यात छापील पुस्तक स्वतः डोळ्याने वाचणे आणि वाचलेले ऐकणे याची सहजतुलना करून बघूया.
छापील पुस्तक असो किंवा ई-बुक असो ते डोळ्याने वाचावेच लागते.
ही कृती शरीराला तसेच मेंदूलाही कसरतीची आहे.
कित्येकांना ही स्वतःच्या डोळ्याने आणि डोक्याने वाचण्याची कसरत झेपत नसल्यानेच ते वाचनापासून दूर राहतात.
परिणामी, साहजिकच पुस्तकातून आणि ग्रंथातून मिळू शकणाऱ्या स्वतःच्या कल्पना शक्तीला चालना देणाऱ्या मनोरंजनापासून तसेच विचारशक्तीला उद्युक्त करणाऱ्या ज्ञानापासूनही दूर राहतात.
आता यापुढे काळ आणि तंत्रज्ञान कितीही बदलले तरी लिखित शब्द प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी वाचणे किंवा वाचलेले ऐकणे हे पुस्तके व ग्रंथांचा आस्वाद घेण्याचे दोनच मार्ग उपलब्ध आहेत व यापुढेही कायम राहतील. त्यामुळे,
वाचणारांसाठी वाचनाला पूरक म्हणून
आणि
न वाचणारांसाठी वाचनाला पर्याय म्हणून
अशा दोन्ही दृष्टीने ऑडिओ बुक्स ही अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त आहेत.
Comments