About
पाल्यसंस्कार | विशेष श्रवण मालिका >> A Unique Series of 5 Audiobooks >> विषय प्रवेश : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा सर्वांसाठी उपयुक्त अशी ही विशेष श्रवण मालिका आहे. यामध्ये ओवी आणि श्लोक स्वरूपातील ज्ञानेश्वरी आणि मनोबोध हे दोन ग्रंथ भावार्थासहित आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, विनायक दामोदर सावरकर आणि मोहनदास करमचंद गांधी यांच्या निवडक विशेष चरित्रगोष्टी आहेत. अशा एकूण पाच ऑडिओबुक्सची ही विशेष श्रवण मालिका आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची 'ज्ञानेश्वरी' आणि संत रामदास स्वामींचा 'मनोबोध' हे दोन ग्रंथ अभिजात मराठीतील अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत. हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्याची कला व शास्त्र शिकवणारे महान ग्रंथराज आहेत. शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी या ग्रंथातून आत्मज्ञानाची विद्या शिकायला मिळते. परंतु बहुतांश घरांमध्ये ज्ञानेश्वरी असली तरी ती संपूर्ण वाचून होईलच असे नाही. तसेच मुलांना थोडक्यात ज्ञानेश्वरी समजावून सांगायची तर ती पालक आणि शिक्षकांनाही सहज शक्य होत नाही. म्हणूनच संस्कार ज्ञानेश्वरी या ऑडिओबुकमध्ये प्रत्येक अध्यायाचे सार सांगणाऱ्या गाभ्याच्या ओव्या पठण, गायन व भावार्थ निरूपण आणि सर्वात शेवटी अर्थासहित पसायदान आहे. 'सार्थ मनोबोध' या दुसऱ्या ऑडिओबुकमध्ये मनोबोध अर्थात मनाचे श्लोक या ग्रंथातील सर्व २०५ श्लोक पठण व निरूपण स्वरूपात सादर केले आहेत. ओवी आणि श्लोक स्वरूपातील गद्य भावार्थसहित हे दोन्ही पद्य ग्रंथ विशेषतः सकाळच्या वेळी ऐकण्यासाठी उपयुक्त आहेत. याद्वारे श्रवण, ग्रहण, उच्चारण, पाठांतर इत्यादि गुणांचा विकास होऊ शकतो. पुढील तीन भागात छत्रपती शिवाजी महाराज, विनायक दामोदर सावरकर आणि मोहनदास करमचंद गांधी यांच्या निवडक चरित्रगोष्टी आहेत. या गोष्टीतून विविध गुणांचा परिचय करून देण्यात आला आहे. या गोष्टी मुलांसहित विशेषतः रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी ऐकण्यासाठी अत्यंत सुयोग्य अशा आहेत. या पाच भागांच्या माध्यमातून धार्मिक, आध्यात्मिक, नीती व चरित्र यांचे उत्तम संस्कार घडवता येऊ शकतात. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही पाच ऑडिओबुकची विशेष श्रवण मालिका आहे. चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा!
You can also join this program via the mobile app. Go to the app