About
ब्रिटीश सत्तेच्या कालखंडात बहुतांश संस्थानिक राजे ऐशोआराम आणि निव्वळ सत्ताकेंद्री राजकारणात गर्क असताना शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योग, कलानिर्मिती, पायाभूत सुविधा, सार्वजनिक बांधकाम अशा सर्वच सामाजिक क्षेत्रात समताकेंद्रित आणि रयतकेंद्रित विचार करून लोकोत्तर कार्य करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचे चरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे. >> राजा कसा असावा आणि राज्यसत्तेचा लोकहितार्थ वापर कसा करावा, याचा आदर्श वस्तुपाठ शाहू महाराजांनी घालून दिला. महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानणाऱ्या शाहूराजांनी समाजातील सर्व थरातील लोकांच्या कल्याणाचा ध्यास घेतला. राज्यकर्ता म्हणून त्यांनी त्याकाळी राबवलेली लोकहिताची सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक धोरणे स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत दिशादर्शक ठरली आहेत. शाहू महाराजांनी दिलेली शिष्यवृत्ती, प्रोत्साहन, पाठबळ यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व घडू शकले. त्यामुळेच भारतीय संविधानाच्या निर्मितीत छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यनीती आणि विचारांची छाप आहे. >> शाहूराजांच्यामुळे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी उभी राहिली, शास्त्रीय व लोकसंगीत कलेला, हस्तकला, वास्तूकला, शिल्पकला, नृत्यकला इत्यादि सर्वच कला आणि कलाकार यांना छत्रपती राजर्षि शाहू महाराजांनी खंबीर राजाश्रय दिला. कुस्ती, मल्लखांब इत्यादि देशी व क्रिकेट, बॅडमिंटन इत्यादि विदेशी खेळ व खेळाडू यांच्यासाठीही स्वतः पुढाकार घेऊन भरीव योगदान दिले. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शैक्षणिक शिष्यवृत्ती, शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण, उद्योगधंदे, व्यवसाय इत्यादि सर्वच बाबतीत आपल्या प्रजेला समान संधी मिळाव्यात आणि सर्वांचा स्व-प्रयत्नाने व स्वाभिमानाने उत्कर्ष व्हावा यांची निरंतर तळमळ बाळगणारा आणि त्यासाठी आपल्या राज्यपदाचा उपयोग करून आधुनिक काळाशी सुसंगत कायदे व तरतुदी करणारा, प्रजेच्या मानसिकतेत सुयोग्य बदल व्हावा यासाठी प्रसंगी कठोर होऊन न्यायनिर्णय करणारा, सामान्य माणसात मिसळून त्यांच्या भाषेत त्यांचे सहज प्रबोधन करणारा प्रभावी वक्ता अशा थोर राजाचे हे चरित्रकथन. >> या ऑडिओबुकमध्ये शाहू महाराजांचे लोकोत्तर जीवन व कार्य यांचा सूत्रबद्ध सविस्तर आढावा घेतला आहे. यामध्ये एकूण १६ प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : २ तास ३५ मिनिटे)
You can also join this program via the mobile app. Go to the app