About
सार्थ बुधभूषण | सुबोध संविधान >> विशेष श्रवण मालिका >> विषय प्रवेश : प्राचीन व मध्ययुगीन राजनीतीची सूत्रे सांगणारा छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण हा ग्रंथ आणि आजच्या राजनीतीची सूत्रे सांगणारा संविधान हा ग्रंथ हे दोन्ही ग्रंथ आजच्या काळात राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय, व्यवस्थापन इत्यादि क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकास अभ्यासणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण हा ग्रंथ म्हणजे स्वतः राजाने किंवा राजपुत्राने राजनीतीवर लिहिलेल्या काव्य ग्रंथाचे जगाच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण होय. राजनीती, शासन आणि प्रशासन या विषयांवरील हा एक महत्त्वाचा संस्कृत काव्यग्रंथ आहे. तसेच स्वतंत्र भारताला एका सूत्रात बांधून सार्वभौम लोकशाही राष्ट्राची आधारशीला आणि मार्गदर्शक सूत्र म्हणजेच भारताचे संविधान होय. भारताचे संविधान हे केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक समुदायासाठीही एक महत्त्वाचा राजकीय दस्तावेज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताच्या घटना समितीने निर्मिलेले हे संविधान म्हणजे भारताच्या भविष्याचा 'रोडमॅप' आहे. शासन, प्रशासन, सार्वजनिक संस्था आणि जनता या सर्वांसाठी आदर्श आचार संहिता भारतीय संविधान आपल्याला देते. रयतेचे राज्य, कल्याणकारी राज्य ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या राजनीतीची प्रमुख सूत्रे होती. 'ज्ञान हेच मनुष्याचे भूषण आहे' असे सांगणारा बुधभूषण हा ग्रंथ याच सूत्रांची शिकवणूक देतो. आधुनिक काळात स्वतंत्र भारताच्या लोकशाही राज्यघटनेतही हेच सूत्र स्वीकारले आहे. म्हणूनच चांगले नागरिक घडवण्यासाठी या दोन्ही ग्रंथांचा शालेय स्तरापासूनच अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. परंतु बुधभूषण ग्रंथ मूळ संस्कृत भाषेत आहे आणि त्यामुळे अनेकांना तो मुळातून वाचणे कठिण जाते. तसेच भारतीय संविधानाची मूळ कायदेशीर भाषा वाचून समजून घ्यायला थोडी किचकट वाटते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांकडून तो सहजपणे वाचून होत नाही. म्हणूनच या पाच भागांच्या विशेष श्रवण मालिकेत पहिल्या तीन भागांत छत्रपती संभाजी महाराज लिखित संपूर्ण बुधभूषण हा महाग्रंथ मूळ संस्कृत श्लोकांचे पठण व त्याचे सुबोध मराठीत भावार्थ निरूपण अशा स्वरूपात सादर केला आहे; तर पुढील दोन भागात संपूर्ण संविधान सोप्या मराठीत समजावून सांगितले आहे. चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा!
You can also join this program via the mobile app. Go to the app