आजच्या पिढीतील लहान मुलांना जन्मतःच टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट वगैरे माध्यमांची ओळख होते आणि सहजपणे ही सर्व माध्यमे वापरायची सवयही होते. त्यातून अनेक सकारात्मक गोष्टी आणि कौशल्ये शिकता येतात. माहितीचे आणि ज्ञानात भर घालण्याचे अनेक स्त्रोत उपलब्ध होतात. परंतु एकूणच या माध्यमात उपलब्ध असलेल्या असंख्य पर्यायामुळे मनाच्या मूळच्या चंचल स्वभावात भरच पडते. त्यामुळे तात्कालिक कुतूहल शमवणारी हजारो विषयांची माहिती आपल्या मेंदूत साठत जाते. मात्र या माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी त्यावरील चिंतन, मनन आणि अनुसंधान हे घडतेच असे नाही. पुस्तके आणि ग्रंथवाचनाने हे घडून येते.
ही सर्व आधुनिक माध्यमे वापरताना सर्वांचाच मनोरंजनाकडेच अधिक कल असतो. ‘डोक्याला ताप नको’ अशी बहुतेकांची सहज निवड होते. पण डोक्याला म्हणजेच मेंदूला ताप दिल्याशिवाय कोणतीही निर्मिती अशक्य आहे. आज आपण आणि आपली पुढची पिढी बहुतांशी दृश्य माध्यमांचे ग्राहक झालो आहोत. आणि यामुळे आपल्या स्वतःच्या कल्पना शक्तीला वाव देणारे वाचनासारखे माध्यम केवळ सोशल मीडियावरील लिखाणापुरते आक्रसले आहे. साक्षरतेच्या वाढी बरोबरच पुस्तके आणि त्यांचे ग्राहक वाढायला हवेत. परंतु या उलट पुस्तकांच्या माध्यमातून घडणारे विस्तृत व सखोल वाचनाचे विश्व आक्रसत चालले आहे.
कोणत्याही प्रदेशात राहणाऱ्या कोणत्याही वयाच्या माणसाला स्थानिक अन्न आणि पाणी याची जितकी गरज रोजच्या रोज लागते, तितकीच आणि तशीच वाङमयाचीही गरज आहे. यातून नव्या जुन्या पिढीला एकत्रितपणे स्थानिक भाषा, संस्कृती, लोकव्यवहार, लोकपरंपरा, लोकजीवनशैली या सर्व स्थानिक गोष्टींची स्थानिक भाषेतून मूलभूत ओळख करून देण्याची आणि घेण्याची आवश्यकता आहे. शरीराला जसा रोजचा सकस खुराक आवश्यक आहे तसाच मन व बुद्धीसाठीही सकस वैचारिक खुराक आवश्यक आहे.
भारतीय लिखित व मौखिक वाङमय हे अक्षय ज्ञानाचा ठेवा आहे. धर्म, अध्यात्म, नीती, तत्त्वज्ञान, व्यवहार, राजकारण, अर्थकारण, समाजनियमन, इतिहास, आत्मचरित्र, चरित्र, कथा, काव्य, नाट्य, कादंबरी, निबंध, भाषणे, टीका, समीक्षा, समालोचन, संपादन, संशोधन, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविकास, भौतिक विकास, कला, कौशल्य, व्यवसाय शिक्षण, व्यापार शिक्षण, आधुनिक विज्ञान, तंत्रशिक्षण, इत्यादि जीवन समृद्ध आणि विस्तारित करणाऱ्या विषयांवरील अमूल्य साहित्याचा मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये विपुल खजानाच आहे. या सर्व साहित्याला शेकडो, हजारो वर्षांची परंपरा आहे. त्याचबरोबर ते समकालीनही आहे. हा सर्व अमूल्य वाङमयठेवा प्रत्येक सर्वसामान्य शिक्षित, अशिक्षित, अल्पशिक्षित कोणत्याही वयाच्या स्त्री किंवा पुरुषांना ऐकण्याच्या माध्यमातून म्हणजेच श्रवणातून सहजसाध्य होऊ शकतो. कुटुंबात, समाजात जशी गीत-संगीत ऐकण्याची सहज सवय जडली आहे तशीच निरनिराळे वैचारिक व प्रबोधक ग्रंथपुस्तके ऐकण्याची सवय जडली तर सर्वांवर सर्वोत्तम भाषिक संस्कार घडून येईल.
आपले विपुल संत साहित्य, विविध धार्मिक साहित्य, तसेच स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर इत्यादी कृतिशील विचारवंतांचे, तसेच मराठीतील इतर महत्त्वाच्या साहित्यिकांचे वैविध्यपूर्ण लेखन प्रत्यक्षपणे आपल्या कुटुंबियांच्या वाचनात कितपत येते याचे आपण एक कौटुंबिक ऑडिट करायला हवे. केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपले जगणे समृद्ध करणाऱ्या ज्ञानसाधनेकडे घेऊन जाण्याची प्रचंड शक्ती या साहित्यात आहे. मुख्य म्हणजे आपली लोकसंस्कृती आणि सामाजिक वारसा यातून आपल्या समाजाचे आणि आपले स्वतःचे आत्मभान देण्याची आणि व्यक्ती व समाज म्हणून आपल्या विकासाची प्रचंड शक्ती आहे.
अवघड अवघड म्हणून मूलभूत वैचारिक वाङमयापासून दूर जायची गरज नाही. कारण जे जे वाचणे अवघड ते ते ऐकणे सोपे हा सहजसाध्य मंत्र आता प्रत्येकाला प्राप्त झाला आहे. गरज आहे ती कान, ध्यान आणि अवधान देण्याची.
तुम्ही आम्ही सर्व मिळून आपली मराठी श्रवण संस्कृती रुजवूया. श्रवण संस्कृती फुलवूया.
मुळांकडे जाऊया! आकाशाकडे वाढूया.
Comments